आता दिवाळीचे स्वरूप थोडे बदलले आहे, पण उत्साह तोच आहे. पूर्वी दिवाळी म्हटली की लहान थोर सारेच तयारीला लागत. लहान मुलांच्या दिवाळीतील परीक्षा संपून, लहान मुले रंगीबेरंगी कागदाचे कंदील बनवायला सुरवात करतात. कोणी मातीचे ढीग बनवून त्यावर किल्ले बनवतात, त्यासाठी लागणारे साहित्य जुन्या वस्तू मधून तयार करतात.
पूर्वी आत्तासारख्या बिल्डिंग नव्हत्या, फार फार तर एखादे मजले असलेली घरे असत, नाहीतर सगळीकडे चाळीचं असत. त्या चाळींमध्ये दिवाळी म्हणजे एकाच घरांत असणारा सण वाटे. प्रत्येक घरातून वेगवेगळ्या पदार्थांचा सुवास यायचा, त्यावरून कोणता पदार्थ तयार होतोय हे लक्षात यायचे, आणि एक वेगळीच उत्सुकता लागून रहायची.
चाळीतील सगळ्यांच्याच घरातून दिवाळीची लगबग सुरू असायची. त्याकाळी रेडीमेड कपडे नसत, त्यामुळे कपड्याच्या दुकानातून कापड विकत घेऊन ते दिवाळीआधी दहा पंधरा दिवस आधीच शिवायला टाकले जात, जेणेकरून दिवाळीला पहाटे अभ्यंग स्नान करून घालता यावीत, यासाठी आधीच तयारी म्हणून लवकर शिवायला देत.
खासकरून बायका आणि लहान मुलांची कपडे , लक्ष ठेऊन आधीच तयारीत ठेवत. त्यानंतर इतर पुरुष मंडळींची कपडे घेतली जात. प्रथम प्राथमिकता लहान मुले आणि बायका यांना दिली जात होती. दहा पंधरा दिवस आधीच फराळाची तयारी केली जायची, त्यासाठी लागणारे साहित्य किराणा मालाच्या दुकानातून घेऊन, त्याची व्यवस्थित मांडणी मोजून मापून ठेवत असत. शेजारच्या बायका एकमेकींकडे जाऊन किती तयारी झालीय याची चाचपणी करायच्या, एकप्रकारची शर्यतच असायची दिवाळीची.
दिवाळीचे पदार्थ तयार करताना, त्यासाठी लागणारी भांडी, साचे एकमेकांना दिली जात. प्रत्येक घरातून दिवाळीच्या फराळासाठी लागणारे साचे या घरातून त्या घरात दिले जात, त्यामुळे एकप्रकारचा आपुलकीचा भाव त्यातून निर्माण व्हायचा. असे वाटावे की एक घरगुती समारंभ किंवा लगीन घाई असावी असा सर्वांना भास व्हायचा. अशी जुन्या काळातील दिवाळी दिवस असायचे. आज काही थोड्या चाळी उरल्यात त्यात तोच दिवाळीचा भाव किंवा वातावरण अजून जपले जातेय. पण खरी दिवाळी त्या काळातील गरिबीत पण दिमाखात दिसायची, ही तिचं वैशिष्ट्य खास असायचे.
वर्षाला नवीन कपडे फक्त दिवाळीत घेतली जात, कारण आजच्या सारखा पैसा त्याकाळी नव्हता. आणि कपडे पण शिवून घातली जात.
लहान मुलांचीतर चंगळच असायची, दिवसभर कंदील बनवण्यासाठी बांबू शोधून त्याच्या लवचिक काठ्या तयार करून, एकमेकात गुंफून चांदणी आकाराचा कंदील किंवा चौकोनी आकाराचा आकाश कंदील बनवला जायचा. मोठी मुले एकच मोठ्या आकाराचा कंदील बनवून तो रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूला जाड दोरखंड वापरून टांगून ठेवत आणि त्यात एखादा इलेक्ट्रिक बल्ब सोडत, काही ठिकाणी पणती किंवा दिव्यांचा वापर होत असे, पण त्याने कंदिलचा पेपर जळत असे. त्याकाळी इलेक्ट्रिक वापर फार कमी असायचा, त्यामुळे लहान मुले बनवलेल्या कंदिलमध्ये एखादी पणती वापरत.
दिवाळीच्या आदल्या दिवशींतर सगळ्यांची धांदल असायची, बायका आपल्या फराळ बनवण्यात गुंतलेल्या असायच्या, बायकांचीतर चुरासच असायची, कोणाचा फराळ आधी तयार होतो, याकडे लक्ष असायचे. यासाठी बायका लहान मुलांना दुसऱ्याच्या घरी पाठवून काय बनतेय याची खातरजमा करून घ्यायच्या आणि आपण किती पुढे आहोत की मागे याचा निर्णय घ्यायच्या. त्या चुरशीत पण एकप्रकारचा आनंद आणि जिव्हाळा असायचा.
पूर्वी दिवाळीच्या दिवसांत फराळाचे एकमेकांना वाटप व्हायचे, प्रत्येक घरा घरांत फराळ दिला जायचा, त्यामुळे बायकांना आपली पाक नैपुण्यता दाखविता येत असे. एकप्रकारे सुगरण परीक्षाच असायची बायकांची. कोणाचे लाडू इतके घट्ट की दाताने फोडणे अशक्यच, पूर्वी विनोदी दिवाळी अंकातून अशा फराळाची विनोद निर्मिती करत. पण त्या देण्या-घेण्यात पण मिश्किलभाव असायचा, हसत खेळत हे सर्व चालायचे.
दिवाळीचे ते सात दिवस म्हणजे सर्वांची धमाल असायची.
आता सोसायटी राहणीमान झाल्याने, हे भावनिक आनंद ऐक्य थोडे कमी झालं आहे. पण दिवाळीचा थाट मात्र तोच आहे.
दिवाळीचा थाट यापुढेही तसाच राहील, यांत शंकाच नाही.
तुम्हा सर्वांना ही दिवाळी सुखाची जावो,
भरभराटीची जावो,
ही सदिच्छा!
0 टिप्पण्या